जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडले

नवी मुंबईतील घटनेनं खळबळ

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच, पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून 42 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच, 36 लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात या अधिकाऱ्याच्या पत्नीला पॅरेलिसिसचा झटका आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वाशी पोलिसांनी या प्रकरणातील भोंदूबाबा व त्याचे सहकारी अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील 62 वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून सध्या ते 56 वर्षीय पत्नीसह वाशीमध्ये राहतात. तक्रारदार हे त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी दुसऱ्या शहरात जाऊन येऊन होते. या कालावधीत त्यांची पत्नी वाशी येथील घरामध्ये एकटीच राहात होती. याचाच फायदा उचलत आरोपी नीलेश हातवळणे उर्फ गुरुजी या भोंदू बाबाने काळ्या जादूची भीती दाखवून पूजा अर्चा करण्याच्या बहाण्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तसेच, तिच्याकडून 42 लाख 8 हजार रुपये किमतीचे 105.2 तोळे सोन्याचे दागिने व 36 लाख 65 हजार रुपयांची रक्कम लुबाडली.

Exit mobile version