| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रविवारी (दि.27) कळंबोली येथील सुधागड शैक्षणिक संकुलात विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक आणि मालक यांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर व रस्ते अपघाताबद्दल समुपदेशन शिबीर राबवण्यात आले.
भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. वाहन चालकांचे शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य याच्यामधील गंभीर उणिवा या अपघाता पाठीमागील प्रमुख समस्या आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक ही एक मोठी जबाबदारीची कामगिरी आहे. अशी कामगिरी पार पाडत असताना वाहन चालक, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ही बाब योग्य नाही. पनवेलमधील विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक हे जबाबदारीने काम करतात. या जबाबदारीच्या जाणिवेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व वाहन चालकांची मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी हे शिबीर राबवले. या नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 308 वाहन चालकांची नोंदणी झाली. याप्रसंगी वाहन चालकांना त्यांचे डोळे, स्वतःच तपासता यावे, यासाठी एका माहितीपत्रकाचे अनावरण केले. सदर माहितीपत्रकामध्ये कलर ब्लाइंडनेस स्वतःच तपासता येतो. अक्षराच्या साईजवरून स्वतःलाच चष्म्याचा नंबर लागला की नाही हे तपासता येते.
या कार्यक्रमास डॉ. सचिन गोमसाळे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक रायगड- अलिबाग, डॉ. पांचाळ मधुकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल, डॉ. गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी, कोकण भवन, पांडुरंग हुमणे, अध्यक्ष विद्यार्थी वाहक संस्था व श्री.नंदू बैकर, अध्यक्ष विद्यार्थी वाहतूक संघटना, पाब्रेकर, सुश्रुषा हॉस्पिटल, पनवेल हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीअनिल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे होते. येत्या महिन्याभरात तीन ते चार ठिकाणी अशाच प्रकारचे शिबीर घेतले जाईल व याचा लाभ सर्व वाहन चालकांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.