कारवाई करण्याची नगरसेवक रितेश मुंढेंची मागणी
| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायत कार्यालयात नगरपंचायत कर्मचारी लोकप्रतिनिधींनाच अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप नगरसेवक रितेश मुंढे यांनी केला असून, अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
आपल्या प्रभागमधील पाण्याच्या पाईपमधील गळतीसंदर्भात वारंवार सांगूनही काम केले जात नसल्याने सोमवारी नगरसेवक रितेश मुंढे व भाजप नेते रवि मुंढे हे नगरपंचायत कार्यालयात गेले होते. त्यांनी सदर कर्मचाऱ्याला याबाबत जाब विचारले असता, तुम्हाला काय करायचे आहे ते करा, अशी अरेरावीची भाषा त्याने वापरली. जर लोकप्रतिनिधींनाच कर्मचारी आशा प्रकारे उद्धट बोलत असतील, तर सर्वसामान्य जनतेला कशी वागणूक देत असतील, असा प्रश्न नगरसेवक मुंढे यांनी उपस्थित केला. तसेच लोकप्रतिनिधींशी उद्धट बोलणाऱ्या या कर्मचाऱ्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणीही नगरसेवक रितेश मुंढे यांनी केली आहे.