| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील रुग्णांना थेट घरपोच आरोग्य सेवा मिळावी, यासाठी उज्ज्वल जनसेवा कल्याण या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मुरूडमधील काशीद येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात उज्ज्वल संस्थेच्या माध्यमातून नुकताच आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ.देवेंद्र खरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. सामान्य आरोग्य तपासणीसह रक्तदाब, मधुमेह तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर त्यांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. गरजू आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यसंबंधित सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश समोर ठेवून ही संस्था काम करीत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम संस्थेने हाती घेतला. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना उज्जवल जनसेवा संस्थेचे डॉ. सतीशचंद्र कीर, डॉ. देवेंद्र खरे, डॉ. अदिति कीर आणि डॉ. दायना यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिबीराच्या माध्यमातून घरापर्यंत आरोग्य सेवा पोहचल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. धावपळीच्या जीवनात नागरिकांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मधुमेह, रक्तदाबसारखे आजार उद्भवण्याचा धोका वाढला आहे. मधुमेह व रक्तदाब या आजाराबाबत जनजागृती करून नागरिकांमध्ये असलेली आजाराबाबत भीती दूर करण्याचा प्रयत्न शिबिराच्या मार्फत करण्यात आला.






