आरोग्य केंद्र उपचाराच्या प्रतीक्षेत

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. गुरुवारी अनेक रुग्णांना उपचारासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत राहावे लागल्याने येथील रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे. याची चित्रफित समाज माध्यमातून पसरली गेल्याने, नागरिकांनीही कोप्रोली आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बर्‍याच वेळा या प्राथमिक आरोग्य केंद्रातश्‍वान दंशाचे इंजेक्शन, विंचू व सर्पदंशावरील औषधे उपलब्ध नसल्याच्याही तक्रारी लोकांकडून होत आहेत.

उरण पूर्व ग्रामीण विभागात आदिवासी आणि शेतकरी नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या शेतकरी व आदिवासी नागरिकांचा निसर्गाशी संबंध येत असल्यामुळे त्यांना या सरपटणार्‍या प्राण्यांपासून धोका असतो. अशा रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी अशा प्रकारची औषधे या रुग्णालयात उपलब्ध व्हावीत, तसेच यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकार्‍यांचीही नेमणूक येथे करावी. जेणेकरून जीवावर बेतणार्‍या या रुग्णांना उपचारासाठी लांबचा पल्ला गाठावा लागणार नाही, अशी मागणी येथील शेतकरी व आदिवासी बांधवांमधून सातत्याने केली जात आहे. मात्र, संबंधित शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर उपचार होत नसल्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना उरण किंवा नवी मुंबई येथे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रालाच उपचाराची गरज असल्याची चर्चा येथील नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version