| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने वशिवली वाडी येथे रविवारी (दि.3) भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वनवासी कल्याण आश्रम (उरण व खालापूर तालुका), डिवाइन फाउंडेशन (नवी मुंबई) आणि एव्हलीन हेल्थकेअर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात 82 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात नेत्रचिकित्सा, स्त्रीरोग, बालरोग आणि सर्वसाधारण तपासणीसह सिकलसेल ऍनिमियाची विशेष तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागात सहसा उपलब्ध न होणाऱ्या महागड्या तपासण्या मोफत मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल समूहातील तज्ज्ञ डॉक्टर सौरव जयस्वाल, अमीर मोहम्मद, काजळ साळुंखे, निमिषा चौधरी, जिगर मिस्त्री आणि डॅनियल कोकम यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार सुचवले. सिकलसेल तपासणीचे काम नरेश व सुमित जगदाळे यांनी पाहिले, तर लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने नेत्र तपासण्या करण्यात आल्या. ज्या रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले, त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. हळदीपुरकर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.
याप्रसंगी खालापूर पंचायत समिती सदस्य महादेव गाढवे उपस्थित होते. वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष मनोज जगन्नाथ ठाकूर यांनी 15 ते 16 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखावरील कॅन्सरच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच 24 मे रोजी दिल्ली येथे होणाऱ्या डी-लिस्टिंग मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एम.एस.डब्ल्यू चेतन चौरे, हरीश जगदाळे, डी.एच. सुब्रमण्यम, सुमित जगदाळे आणि मीरा पाटील यांच्यासह वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील वंचित घटकांसाठी ही सेवा रायगड जिल्ह्यातील इतर पाड्यांवरही सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







