| पनवेल | प्रतिनिधी |
शहरात पहाटेच्या वेळेत भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रहिवासी भाग, सोसायटी परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचे टोळके दिसत असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी कुत्रे अचानक भुंकत पाठलाग करत असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये अधिक भीती पसरली आहे. पालिका प्रशासनाकडून रेबीज प्रतिबंधक लसीकरण (डोस) दिला जात असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यानंतरही कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही भागात लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटनाही घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पहाटेच्या वेळेस रस्ते तुलनेने सुनसान असल्याने ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवते.
भटक्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांनाही धोका निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेने केवळ लसीकरण न करता कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण (स्टेरिलायझेशन) मोहीम अधिक गतीने राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याचीही मागणी होत आहे. या समस्येमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. पनवेलकर नागरिक आता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनेची अपेक्षा व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







