उरण तालुक्यातील आरोग्य धोक्यात

। अलिबाग । प्रतिनिधी ।
उरण परिसरातील जासई-वहाळ-गव्हाण हद्दीतील सिडकोच्या जागेवरील घातक कचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली आहे.विधिमंडळात याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलासा करण्याबाबत विचारणा केली.

उरण परिसरातील जासई-वहाळ-गव्हाण हद्दीत असणार्‍या सिडको व वनखात्याच्या जागांवर बेकायदेशीरपणे मुंबईतील हजारो टन दुर्गंधीयुक्त घातक कचरा, डेब्रीज दररोज टाकला जात आहे. त्यात असलेल्या मृत पशु-पक्षी, प्राण्यांचे अवयव मिश्रीत तयार झालेल्या कचर्‍याच्या डोंगरामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको व वनखात्याच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात होत असलेल्या भरावाच्या कामांसाठी तेथील ठेकेदार दगड मातीऐवजी स्वस्तात मिळणार्‍या कचर्‍याचा भराव करून संबंधित कंपनीकडून लाखो रूपये मिळवतात. याप्रकरणी शासनाने चौकशी करून कचर्‍याच्या व्यवसायातील दलाल, संबंधित सिडको व वन विभागातील दोषी अधिकार्‍यांविरोधात कारवाई करावी. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा प्रश्‍न आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले की, परिसरातील जासई-वहाळ-गव्हाण हद्दीत असण्यार्‍या सिडकोच्या जागांवर बेकायदेशीरपणे राडारोडा (डेब्रिज) टाकला जात आहे. मात्र मृत पशुपक्षी, प्राण्यांचे अवयव मिश्रित तयार झालेला कचरा यामध्ये निदर्शनास आला नाही. सिडकोकडून या विषयाबाबत वेळोवेळी उपायुक्त (गुन्हे) सीबीडी बेलापूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. वनखात्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे भराव केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर वन विभागाकडून गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे, असे सुचित केले..

Exit mobile version