कायम वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टर्स नाहीत
मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
मुरूड शहरात असलेल्या एकमेव शासकिय ग्रामीण रुग्णालयात कायम स्वरुपी वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टर्स नसल्याने येथील आरोग्यसेवा अद्ययावत उपकरणे उपलब्द असूनही रामभरोसे बनली आहे.
येथे नियुक्त करण्यात येणारे एमबीबीएस असणारे डॉक्टर्स कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभाग नेमत असतो.यांचा 1 किंवा 2वर्षांचा कार्यकाळ संपला की, असे डॉक्टर्स अन्यत्र निघून जातात.पुम्हा नवीन डॉक्टर्स नेमणूक होऊन ते सेट होइपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपून जातो. येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक देखील नसून अलिबाग सिव्हील रुग्णालयातील येथील डॉ श्री पडोळे, यांचे कडे मुरूड ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
तीन वर्षांपूर्वी येथे डॉ श्री बागुल, हे पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक होते ते निवृत्त झाल्यानंतर कोणाचीही येथे कायमस्वरूपी नेमणूक झालेली नसून डॉ. पडोळे, अधून मधून मुरूड ला येऊन कामकाज पाहतात. पडोळे यांच्यावर दोन्ही कडील हाताळताना खूप ताण येतोय कारण मुरूड आणि अलिबाग हे अंतर 50 किमी आहे. त्याव्यतिरिक्त कोणताही एमडी किंवा एमएस प्राविण्य डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात नाही.
या रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकार्यांच्या जागा मंजूर आहेत. 1जानेवारी रोजी डॉ शिवानी यांची कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्या अन्यत्र गेल्या. 15:जानेवारी रोजी दुसर्या वैद्यकीय अधिकारी डॉ दिव्या सोनम, यांचा कार्यकाळ संपत आहे.त्या नंतर डॉ विनय हडबे हे वैद्यकीय अधिकारी राहणार असून त्यांना कोरोना किंवा ओपीडी रुग्णांना सेवा देणं अवघड जाईल असे स्पष्ट दिसून येत आहे.येथे येणारे डॉक्टर्स फ्रेश शिकाऊ असतात.अनुभव येईपर्यंत कार्यकाळ संपून जातो. पुन्हा नवीन नेमणूक असा हा प्रकार कित्येक दिवसांपासून मुरुड लेडी कुलसुम व फातिमा बेगम ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे.मुरूड सारख्या डोंगरी आडवळणाच्या तालुक्यात सुसज्ज आरोग्य सेवेची मोठी गरज आहे.परंतु निष्णात डॉक्टर्स नसल्याने येथील रुग्णांना अलिबाग, रोहा अथवा पुणे, मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च करून जावे लागते.फक्त छोटी ऑपरेशन होतात या पेक्षा आधिक काही नाही. कोणाची प्रकृती कधी बिघडेल ते कोणीही सांगू शकत नाही.त्यामुळे पुणे मुंबई पासून लांब असलेल्या मुरूड सारख्या तालुक्यात निष्णात डॉक्टर्स असणे अत्यन्त महत्त्वाचे आहे, या कडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून लक्ष घालावे अशी सर्व थरांतून विनंती करण्यात आली आहे.
रुग्णालयाचे नूतनीकरण
सध्या मुरूड मधील लेडी कुलसुम व फातिमा बेगम ग्रामीण रुग्णालयात रंगरंगोटी आणि नूतनीकरण काम विशेष अनुदानातून सुरू आहे.केवळ इमारतींचे नूतनीकरण करून चालणार नाही.निष्णात सर्जन,भूलतज्ञ, देखील 24 तास उपलब्ध होणे गरजेचे आहे. येथील गंभीर रुग्णांना अलिबाग, रोहा, मुंबईत नेण्या शिवाय पर्याय उरत नाही, अशी येथील अवस्था आहे.म्हणजे औषधे, इमारती, उपकरणे असूनही निष्णात डॉक्टर्स नसल्याने वेळेवर काहीही उपयोग होत नाही.त्यामुळे येथील आरोग्य सेवा रामभरोसे बनलेली आहे.