सर्वसामान्य रुग्णांचे गंभीर हाल; डॉक्टरांसमोर मोठे संकट
| माणगाव | प्रतिनिधी |
ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारी आरोग्यसेवा आज अनियमित वीजपुरवठ्यामुळे गंभीर संकटात सापडली आहे. सतत होणाऱ्या पॉवर फ्लक्चुएशन्समुळे महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे वारंवार बिघडत असून, त्याचा थेट फटका गंभीर रुग्णांच्या उपचारांवर होत आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे माणगाव येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी लक्ष वेधले आहे.
माणगाव येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत सांगितले की, पाटणकर हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील अनेक महत्त्वाची उपकरणे अनियमित वीजपुरवठ्यामुळे बंद पडत आहेत. त्यात व्हेंटिलेटर सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे अत्यंत कठीण बनले आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील रुग्ण मोठ्या शहरांतील रुग्णालयांमध्ये जाण्यास टाळाटाळ करतात. आर्थिक परिस्थिती, प्रवासाचा खर्च आणि शहरातील उपचारांचा वाढता भार यामुळे हे रुग्ण स्थानिक स्तरावरच उपचार घेण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली उपकरणे बंद पडल्यास रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी तब्बल 2 लाख रुपये खर्च करून व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पॉवर फ्लक्चुएशन्समुळे तो निकामी झाला असून, आता त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च करणे शक्य नसल्याने हा व्हेंटिलेटर वापरात आणता येत नाही. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना आवश्यक ती जीवनरक्षक सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
वीजपुरवठ्यातील चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी मागणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुमारे 1 लाख रुपये खर्च करून उच्च क्षमतेचा स्टॅबिलायझर बसविण्यात आले आहे. मात्र, वीजेतील असामान्य आणि तीव्र चढ-उतारांमुळे हा स्टॅबिलायझर देखील निष्प्रभ ठरत आहे. इतकेच नव्हे तर त्यातील पॉवर सर्किट्सही वारंवार खराब होत असल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शहरातील विशेष केंद्रांमध्ये पाठवावी लागतात. त्यामध्ये मोठा खर्च तर होतोच, शिवाय उपकरणे परत येण्यासाठी बराच कालावधी लागतो. तोपर्यंत रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होतात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न आज अनियमित वीजपुरवठ्यामुळे धोक्यात आला असून, संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि महावितरण यांनी त्वरित हस्तक्षेप करून या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
जेव्हा एखाद्या गंभीर रुग्णासाठी आवश्यक उपकरण अचानक बंद पडते, तेव्हा त्याचे परिणाम केवळ आर्थिक नसतात; ते थेट मानवी जीवाशी संबंधित असतात. याची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
डॉ. आबासाहेब पाटणकर,
ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ,
माणगाव
