नवजात बालकांसाठी आरोग्य व्यवस्था अपुरी

अतिदक्षता विभाग, इनक्यूबेटरची संख्या नगण्य; उपचारासाठी महागड्या रुग्णालयात धाव

| चिरनेर | प्रतिनिधी |

जेएनपीए बंदरामुळे जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकणाऱ्या उरणमध्ये अद्ययावत, सुसज्ज हॉस्पिटलच नाही. त्यामुळे याठिकाणी आरोग्य सुविधांची मोठी उणीव आहे. विशेषतः नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग व इनक्यूबेटरची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. या अपुऱ्या व्यवस्थेमुळे गंभीर आणि वेळेआधी जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या उपचारांसाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेलमधील महागड्या खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेण्याची पाळी येते. त्यामुळे नवजात शिशुंच्या उपचारासाठी नागरिकांना उरणबाहेरील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास 2010 मध्ये मंजुरी मिळाली आहे. तसेच, सप्टेंबर 2024 मध्ये त्याचे भूमीपूजनही करण्यात आले आहे. मात्र, सिडकोने उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी दिलेल्या बोकडवीरा येथील 5000 चौमी भुखंडावर खारफुटीचे आक्रमण झाले आहे. खारफुटीमुळे हे भूखंडच सीआरझेडच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे 82.54 कोटी खर्चाचे चार मजली इमारतीतील उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे सार्वजनिक बांधकाम नियोजन ढासळले आहे. तब्बल 16 वर्षे उलटून गेल्यानंतरही या रुग्णालयाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे उरणकरांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. उरण परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत मोठी वाढ होत चालली आहे. त्यामानाने उरण तालुक्यात आरोग्य सुविधा अगदी नगण्य आहेत. विशेषतः नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाची संख्या अगदी नगण्य अशीच आहे. बालकांसाठीच्या अतिदक्षता विभाग तसेच इनक्यूबेटरचा अभाव असल्यामुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आणि वेळेआधी जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या उपचारांसाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेलमधील खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. सरकारी पातळीवर इनक्यूबेटर आणि व्हेंटिलेटरची सोय नसल्याने सामान्य व गरीब कुटुंबांना खासगी रुग्णालयांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्याने बालकांच्या जिवाला धोका निर्माण होतो.

Exit mobile version