| पनवेल | वार्ताहर |
मथूर बैलाचे मालक राहुल पाटील हे जवळपास दोन आठवड्यापासून कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चार एप्रिल रोजी पनवेलच्या न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली न्यायालयाने दोन दिवसाची तारीख दिली असून आता या जामीन अर्जावर सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राहुल पाटील शर्यत प्रेमी राहुल पाटील यांची जामीनवार सुटका होण्याची वाट पाहत आहेत.
बारा मार्च रोजी ओवळे येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल पाटील याच्या मथुर बैलाला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी अश्लील हावभाव, दगडफेक आणि गोळीबार केल्या प्रकरणी राहुल पाटील आणि अन्य 15 ते 20 जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राहुल पाटीलला 15 मार्च रोजी अटक केली. त्यानंतर काहीच दिवसांनी अशीष चव्हाण, मुकेश चित्ते, दिनेश यादव या त्याच्या 3 साथीदारांना देखील अटक करण्यात आली. एका साथीदाराकडून बंदूक जप्त करण्यात आली. न्यायालयाने राहुल पाटीलला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 20 मार्च पासून राहुल पाटील आणि अन्य तिघांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात करण्यात आली. 22 मार्च रोजी राहुल पाटीलच्य जामीन अर्जावर पनवेल न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पनवेल न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर (दि.4) एप्रिल रोजी राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन दिवसाची तारीख दिली. आता राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर पनवेल न्यायालयात 6 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राहुल पाटीलचा आधारवाडी जेल मधील मुक्काम वाढला आहे .राहुल पाटील समर्थक राहुलची जामीनावर कधी मुक्तता होईल आणि तो कधी बाहेर येईल याची वाट पाहत आहेत.