| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या काही मिनिटातच सासू आणि सूनेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुंब्रा परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा रेतीबंदर येथील राणानगर येथे राहणाऱ्या सासू आणि सूनेचा अवघ्या काही वेळाच्या अंतराने रेल्वे धडकेत मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.03) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. निता पवार (75) असे सासूचे तर विजया पवार (40) सुनेचे नाव आहे. सासू निता यांना लोकलची धडक लागल्याचे कळताच, सुनेनं त्या ठिकाणी धाव घेतली. रेल्वे रूळावर सून येताच विजया हिलाही लोकलने धडक दिली. या रेल्वेच्या धडकेत दोघींचाही मृत्यू झाला आहे.
मुंब्रा-कळव्या रेल्वे रूळालगतच्या राणानगर मुंब्रा रेतीबंदर येथे निता आणि विजया त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. दुपारी 1 च्या दरम्यान, निता पवार यांना जलद लोकलची धडक बसली. या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटातच 1.20 वाजण्याच्या सुमारास सासूचा अपघात झाल्याचे कळताच सून विजयाने रेल्वे रूळाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी विजयालाही देखील लोकलची धडक बसली. याच धडकेत विजया गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या सासू, सुनेला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच सासू सूनेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.