। नांदेड । प्रतिनिधी ।
आलेगाव येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातामध्ये 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. घटना घडली तेव्हा ट्रॅक्टरमध्ये एकूण 12 जण असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर शेतात हळद काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून मजुरीसाठी निघाल्या होत्या. आलेगाव शिवारात दोन शेतामध्ये असलेल्या चारीमधून ट्रॅक्टर घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर शेतातील विहिरीमध्ये कोसळला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. मात्र, या अपघातामध्ये 8 महिलांचा मृत्यू झाला. तर एक पुरुष आणि दोन महिला यांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, ट्र्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
अपघाताची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्यातील निमगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रॅक्टरसह ट्रॉलीही बुडाली आहे. क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉलीसह काही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
ताराबाई सटवाजी जाधव (35), ध्रुपता सटवाजी जाधव (18), सरस्वती लखन बुरड (25), सिमरन संतोष कांबळे (18), चउत्राबाई माधव पारधे (45), ज्योती इरबाजी सरोदे (35), सपना तुकाराम राऊत (25) अशी मृतांची नावे आहेत. तर पार्वतीबाई बुरड (35), पुरभाबाई कांबळे (40) आणि सटवाजी जाधव (55) अशी या अपघातातून वाचलेल्यांची नावे आहेत.