| ठाणे | प्रतिनिधी |
अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथील मोरीवली गावात राहणारी 45 वर्षीय वैशाली धोत्रे आणि महालक्ष्मी नगर येथील 29 वर्षीय आतिष आंबेकर हे दोघे आनंदनगर एमआयडीसीतील एकाच कंपनीत काम करत होते. रविवारी (दि.20) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघेही कामावरून घरी परतत होते. आतिष वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडजवळील मोरीवली गावात गेला होता. वैशाली या हेडफोन लावून फोनवर बोलत रेल्वे रुळ ओलांडत होत्या. यावेळी रेल्वे येत असल्याचे आतिष आणि इतर काही लोकांनी पाहिले. त्यांनी वैशाली यांना हाक मारली, परंतु हेडफोनमुळे त्यांचे लक्ष नव्हते. वैशाली यांना वाचवण्यासाठी आतिष धावला, पण दुर्दैवाने रेल्वेने दोघांनाही धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आतिष हा त्याच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता आणि त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली होती. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैशाली यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि 22 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड या मार्गावर पादचारी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





