शेडअभावी उन्हाचे चटके

| दिघी । वार्ताहर ।
तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची वाट रखरखत्या उन्हात चटके सोसत करावी लागत आहेत. येत्या काही दिवसांत शेड झाली नाही, तर पावसाळ्यातही प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. बोर्लीपंचतन शहरात 2021 मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे जुन्या बसस्थानकाच्या मोकळ्या भूखंडावर नव्याने स्थानक बांधण्यात यावे आणि प्रवाशांना सुविधा मिळावी, अशी मागणी दोन वर्षांपासून प्रवाशांकडून होत आहे.

बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे; तसेच दिवेआगर, हरिहरेश्‍वर, दिघी – जंजिरा अशी पर्यटन स्थळे एसटी वाहतुकीने जोडली आहेत. येथे दिवसातून 74 बसगाड्यांची नोंद होते. मुंबई, पुणे शहरांसह गाव खेड्यातील नागरिक प्रवास करत आहेत. बोर्लीपंचतन मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे शेकडो विद्यार्थी व प्रवासी भर उन्हात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे असतात. तसेच विद्यार्थ्यांना एसटी पास संदर्भातील माहिती अधिकार्‍याची नेमणूक नसल्याने उपलब्ध होत नाही. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे महामंडळाचा सर्व कारभार वार्‍यावर आहे. दोन वर्षांपासून बसस्थानकाची होत असलेली मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहे.

Exit mobile version