34 प्रवासी असलेल्या स्लीपर बससह 40 हून अधिक गाड्या जळून खाक
। जयपूर । वृत्तसंस्था ।
राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेने सीएनजी टॅंकरचा मोठा स्फोट झाला. यात 34 प्रवासी असलेल्या स्लीपर बससह 40 हून अधिक गाड्या जळून खाक झाल्या असून 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण होरपळून गंभीर जखमी झाले आहेत.
जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दि. 20) सकाळी केमिकलचा एक टँकर दुसऱ्या टँकरवर आदळला. त्यामुळे सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे सर्वत्र आगीचा भडका उडाला. या घटनेत टँकरच्या आजुबाजुला असलेल्या 40 हून अधिक वाहनांनी पेट घेतला. यात 34 प्रवासी असलेली स्लीपर बसही जळाली. 34 प्रवाशांपैकी 20 प्रवासी होरपळले आहेत. दरम्यान, 14 प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टर बेपत्ता आहेत. टँकरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की अनेक पक्षीही दगावले. बस आणि ट्रकसह महामार्गावरील अनेक वाहनांनाही आग लागली. आगीच्या उकाड्यामुळे दुचाकीस्वाराचे हेल्मेट पघळून चेहर्याला चिकटले आणि त्याचे डोळेही भाजले.
लेकसिटी ट्रॅव्हलची बस गुरुवारी रात्री नऊ वाजता उदयपूरहून निघाली. त्यावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते. अजमेर येथे एक प्रवासी उतरला होता. ही बस जयपूरला सकाळी 6.30 वाजता पोहोचणार होती, पण पहाटे 5.45 वाजता अपघात झाला. बसमधील प्रवाशाने सांगितले की, अचानक बसला आग लागली. बसच्या मुख्य गेटलाही कुलूप होते. त्यामुळे लोकांना बाहेर येण्यास उशीर झाला आणि अनेकांचा मृत्यू झाला. या अपघातात बस चालकाला पहिला फटका बसला. घटनास्थळी 2 ते 3 किलोमीटर परिसरात रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर सुमारे तासभर स्फोटांचे आवाज ऐकू आले. हवेत वेगाने पसरणार्या वायूमुळे हा अपघात भीषण झाला. शेजारी राहणार्या लोकांनी सांगितले की, स्फोट ऐकून ते बाहेर आले तेव्हा लोक इकडे तिकडे धावत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 30 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.