अवघा रायगड गणेशमय

बाजारपेठा फुलल्या; लाखोंची उलाढाल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी रायगडात घराघरात सुरु झाली आहे. त्यामुळे सारे वातावरण गणेशमय झाल्याचे दिसत आहे. खरेदीसाठी बाजारपेठाही फुलल्या आहेत.लाखोंची उलाढाल यानिमित्ताने होत आहे.

बुधवारी (दि.31) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्याची तयारी चार दिवसांपासूनच सुरु झाली आहे. रविवारी विविध वस्तुंच्या खरेदीसाठी सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. बाप्पांच्या मूर्ती खरेदी करण्याबरोबरच उत्सवासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंच्या खरेदीसाठी सर्वत्र गर्दी झाल्याचे दिसत आहे.गर्दीचा हा वेग आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. दोन वर्षानंतर हा सण कोणत्याही निर्बंधाविना साजरा होत असल्याने गणेशभक्तांचा आनंदही द्विगुणीत झाल्याचे दिसत आहे. घराघरात आता विविध आकर्षक सजावटी करण्याचे काम सुरु आहे. अनेक घरात कल्पकतेने देखावेही सादर केले जात आहे.

पावसाने उघडीप दिली असल्याने गणेशभक्तांचा उत्साह वाढला आहे. दरम्यान, महामार्गावरील अवजड वाहतूक शुक्रवारपासून बंद करण्यात आली आहे. याशिवाय खड्डे बुजविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु असल्याने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा प्रवासही सुखकर होत आहे. पनवेल ते पोलादपूर या रायगड हद्दीत पोलिसांचा जागता पहारा आहे. जिथे जिथे कोंडी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बल ठेवण्यात आले आहे. याचा फायदा गणेशभक्तांना होत आहे.

Exit mobile version