हवामान विभागाचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे, तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे. रायगड आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टीवरील इतर भागांत ऑरेंज अलर्ट जारी आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात 107 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता आहे.