। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने हे जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवचे अस्तित्व अबाधित ठेवावेत, अन्यथा चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकर्यांनी प्रशासनाला दिला आहे.
शेतजमीन सुरक्षितेसाठी सिडकोने चाणजे, ता. उरण येथील शेतकर्यांच्या जमिनी संपादन न करता शेतकर्यांच्या जमिनीवर साकव बांधले. साकवच्या सुरक्षितेसाठी येथून जडवाहतूक न होण्यासाठी हाईट गेज लावण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडून करंजा टर्मिनल कंपनीस फक्त 2016 चा पावसाळा होईपर्यंत 25 टन पर्यंत वजनाच्या वाहतुकीस पत्राद्वारे परवानगी देण्यात आली होती. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत हाईट गेज लावण्यात आलेले नाही. परिणामी करंजा टर्मिनल प्रा.ली. कंपनीकडून जडवाहतूक बेकायदेशीररित्या होत आहे. विशेषतः रात्री खूप मोठ्या प्रमाणात जड वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे संबंधित साकवचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.