गणेशभक्तांसाठी महामार्गावरील अवजड वाहतूक बंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणार्‍या भक्तांचा प्रवास सुखकर आणि निर्विघ्नपणे व्हावा, यासाठी सरकारच्यावतीने शुक्रवारपासून (दि.27) अवज़ड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच मार्गावर जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होते. या पाश्‍वर्र्भूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या मार्गावर होणार्‍या वाळू-रेतीच्या ट्रकची तसेच मोठया अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.

27 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 8 वाजेपर्यंत 6 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांना वाहतुकीस पूर्णत: बंद करण्यात आली आहे. याशिवाय पाच, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन तसेच 4 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून ते 6 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांचे गणपती विसर्जन होणार आहे. दरम्यान, 9 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशी सर्व वाहने वाहतुकीस पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत वाळू, रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणार्‍या वाहनांना पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

या वाहनांना सवलत
दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार्‍या वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही. तसेच रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणार्‍या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.

या संदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/ महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येईल. तसेच जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील. याकरिता वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे.

राजेंद्र होळकर, सहसचिव
Exit mobile version