कठोर कारवाई नागरिकांची मागणी
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पोलिसांकडून बाजारपेठ, एसटी स्थानक परिसर आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, शहराबाहेरील रस्त्यांवर अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनाच सॉफ्ट टार्गेट केले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नागरिकांनी हेल्मेटच्या सुरक्षात्मक महत्त्वाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, कारवाई करताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची मागणी केली आहे. रोह्यासारख्या छोट्या शहरात दैनंदिन किरकोळ कामांसाठी वारंवार दुचाकीचा वापर करावा लागतो. त्यामुळे केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता बेदरकार वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, धूम स्टाईल बाईकस्वार आणि वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यासोबतच शहरातील अवैध धंद्यांवरही प्रभावी कारवाई करून कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हेल्मेट सुरक्षेसाठी आवश्यक आहे. मात्र, शहरातील अल्प अंतराच्या प्रवासाचा विचार करून नियमांची अंमलबजावणी व्यावहारिक पद्धतीने व्हावी.
संदीप सरफळे,
सरचिटणीस, रोहा सिटीझन फोरम
राजेंद्र जाधव,
शहराबाहेरील रस्त्यांवर हेल्मेट सक्ती योग्य आहे. पण शहरात धूम स्टाईल, ट्रिपल सीट आणि बेदरकार वाहनचालकांवर आधी कठोर कारवाई व्हायला हवी.
सामाजिक कार्यकर्ते
