अपघातग्रस्तांचे फोटो काढण्यापेक्षा मदत करा: विजय चामे

| नेरळ | प्रतिनिधी |

कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी बघणार्‍यांची गर्दी अधिक असते. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी व्हिडीओ, फोटो काढण्यापेक्षा मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन पनवेल येथील विभागीय वाहतूक अधिकारी विजय चामे यांनी केले. नेरळ येथे असलेल्या रिक्षा संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

रिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल येथील विभागीय प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आले होते. त्यावेळी विभागीय परिवहन विभाग पनवेलच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजया चामे, सुयोग्य पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेश नांदगावकर, हवालदार नितीन अहिरे, अनघा पाटील, शेखर मोरे, डॉ. सचिन वाणी, कर्जत अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, साई रुचिता मोटार स्कूलचे नरेश साळुंके, राहुल साळुंके, नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मोरे, महेंद्र बॅचम, संतोष भोसले, जय मल्हार रिक्षा संघटनेचे उपसचिव भगवान जामघरे, खजिनदार श्रावण जाधव, लक्ष्मण चंचे आदी यावेळी उपस्थित होते.

नेरळ एसटी स्टॅन्ड येथे 25 वर्षे व्यवसाय करणार्‍या जय मल्हार रिक्षा संघटनेच्या मालक चालक यांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजय चामे यांनी मार्गदर्शन केले. रिक्षा टॅक्सी चालक यांनी प्रवासी वाहतूक करताना आपल्या प्रवाशांशी अदबीने वागले पाहिजे. समाजात रिक्षा चालक म्हणून आपलीदेखील एक प्रतिष्ठा असून ती जपली गेली पाहिजे. त्यामुळे रिक्षा चालक यांनी दुसर्‍या वाहनाना कट मारणे, प्रवाशांना अतिरिक्त भाडे आकारून लुटणे असे प्रकार घडत कामा नये, असेही ते म्हणाले. यावेळी नागरिक आणि रिक्षा चालक यांना कर्जतच्या अग्निशमन दलाने रिक्षा टॅक्सी यात असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Exit mobile version