। नेरळ । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान डिकसळ येथे पार पडले. मेडिकल शिक्षण घेणार्या भावी डॉक्टरांना रस्ते अपघाता विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल आणि समर्थ मोटर ट्रेनिंग स्कूल कर्जत ह्याच्या संयुक्त विद्यमाने 36 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त भावी डॉक्टर यांना रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विभागीय परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक अजय कराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चला संकल्प करूया आणि अपघात विरहित रायगड जिल्हा बनवू या यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली. सुरक्षा अभियान रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेत महाविद्यालयातील भावी डॉक्टरांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती पवार यांनी रस्त्याने वाहन चालवताना वाहन चालक म्हणून कोणकोणते नियम पाळले पाहिजेत याबाबत माहिती दिली. तर रस्त्याने प्रवास करताना एखादा अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना कशी मदत केली पाहिजे यावर देखील मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.
डिकसळ येथील डॉ नंदकुमार तासगावकर मेडिकल कॉलेजमध्ये रस्ते सुरक्षा अभियान निमित्त आयोजित शिबिराला विभागीय परिवहन अधिकारी पोलीस निरीक्षक अजय कराळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती पवार यांच्यासह मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. विनायक सबनीस, रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाग्र पटेल, कायदेशीर सल्लागार अॅड. रमाकांत तरे, अभिजित मराठे आणि निलेश मराठे हे उपस्थित होते.