हमरापूर विभागातील पूरग्रस्तांची केली पाहणी
| पेण | वार्ताहर |
हमरापूर विभागातील पूरपरिस्थितीमुळे येथील घरांबरोबरच गणपती कारखान्यात पाणी जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेकापचे माजी आ. पंडित पाटील यांनी केली. शुक्रवारी त्यांनी तांबडशेत पूरग्रस्त भागाचा दौरा करुन येथील घरे तसेच गणपती कारखान्यांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, जोहे येथील रस्ता खचला आहे. त्याची दुरूस्ती झाली पाहिजे. तसेच तेथे मोरी झाली पाहिजे ही लोकांची मागणी आहे. यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून याबाबत कल्पना दिली आहे. रावे परिसरातील अरुंद मोऱ्या व रेल्वेच्या मोरीमुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही पंडित पाटील यांनी सांगितले.
तांबडशेत, जोहेमधील खचलेल्या रस्त्याची पाहणी करून संबधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून दुरुस्तीबाबत सूचना पाटील यांनी दिली. यावेळी तांबडशेत, कळवे, जोहे परिसरातील गावांत जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. हमरापूर विभागातील हमरापुर, जोहे, कळवे, सोनखार, तांबडशेत, उर्नोली, दादर, रावे व इतर अनेक गाव, बेडी येथील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने गणपती कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी कळवे ग्रामपंचायत कार्यलयाला भेट दिली. त्यांच्यासह रविंद्र पाटील, कळवे सरपंच सतिष पाटील, उपसरपंच, सदस्य, संदीप पाटील कुर्डुस ग्रामपंचायत माजी सरपंच, जोहे सरपंच जयवंती पाटील, माजी सरपंच सचिन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पंडितशेठ पाटील यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधून या परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रांत कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच वडखळ ते पेणदरम्यान खड्डे भरण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याबाबत सांगितले