‘इथे’ पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज ; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवतानाच हवामान विभागानं आजसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. सलग तिसर्‍या दिवशीही पावसाने जिल्ह्याला झोडपले. भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळीसह अर्जुना नद्यांनी पाणी पातळी ओलांडली असल्यानं किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संगमेश्‍वर व लांजा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर शहरातही पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं राजापूरमधील अर्जुना व कोदवली या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. मुख्य चौक असलेल्या जवाहर चौकाला पाण्याचा वेढा बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. पोलीस, नगरपरिषद प्रशासन 24 तास सतर्क झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 130.26 मि.मी. पाऊस झाला. त्यात मंडणगड 215.10, दापोली 94.30, खेड 46.50, गुहागर 135.60, चिपळूण 102.50, संगमेश्‍वर 145, रत्नागिरी 162.90, राजापूर 128.70, लांजा 141.70 मि.मी. नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या मंडणगड तालुक्यात अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले आहेत. तेथील परिस्थिती आटोक्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. पुराचे पाणी ओसरल्याने संपर्क तुटलेल्या राजापूर, मंडणगड, खेड तालुक्यातील गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रत्नागिरी तालुक्यात मंगळावारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. सायंकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतली होती. काजळी नदीची पाणीपातळी धोक्याच्या इशार्‍यापर्यंत स्थिरावली आहे. चिपळूण, खेडमध्येही वाशिष्ठी, जगबुडी नद्यांचे पाणी पातळीपर्यंत आले आहे. आजही पावासाचा जोर वाढल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Exit mobile version