डाव्या-उजव्या कालव्यात अवतरणार हेटवण्याची गंगा

निधी प्राप्त करण्याची फाईल अर्थ मंत्रालयाकडे

| पेण | मुस्कान खान |

गेली 28 वर्षे डाव्या कालव्याला पाणी येईल आणि शेती फुलेल, अशी आशा करुन बसलेल्या पेणच्या खारेपाट विभागातील नागरिकांसाठी 2024 हे नवे वर्षे फलदायी ठरणार आहे. या वर्षात त्यांच्या भागातून हेटवणेची गंगा अवतरणार आहे. निधी प्राप्त करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे फाईल पाठविली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आवश्यक तो निधी उपलब्ध होणार असून त्यातून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.

पेणमधील हेटवणे मध्यम प्रकल्पाची निर्मिती ही पेण खारेपाटातील शेती ओलिताखाली येऊन शेती समृध्द व्हावी यासाठी झाली. डावा-उजव्या कालव्याचे काम निधीअभावी रखडले होते. आता पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आली आहे. 30 कोंटीची हेटवणे ते शहापाडा धरण आणि पुढे वाशी वडखळ आणि उंबर्डे विभागातील गावे, वाडयांवर मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरु होणार आहे. मात्र, सिंचनासाठी हेटवणे कालवा विभागाचे काम रखडले आहे. सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी लागणारा 763 कोंटीचा विकास निधी जानेवारी 2024 महिन्यात उपलब्ध होणार आहे.

सध्या हेटवणे धरण प्रकल्पावर कामार्ली, आधरणे, तळवली, सापोली, बोरगाव, रोडे, काश्मिरे, शेणे या ओलिताखालील गावात रबी हंगामात उन्हाळयात भातशेती, भाजीपाला शेती, फुलशेती व थोडया प्रमाणात कलिंगडाची शेती करण्यात येते. सुमारे 1700 एकरावर रबी हंगामात पीक घेतली जातात. उन्हाळी भातशेती फायद्याची ठरते. जर हेच पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून वाशी खारेपाटातील व हमरापूर विभागातील गावांना मिळाले असते, तर पेण तालुक्यातील सर्व विभागातील 6,668 हेक्टर क्षेत्रावर समृध्दीचे दार उघडले असते. कोणत्याही उद्योजकाने येथील शेतकऱ्यांच्या जमीनी घेण्याचे धाडस केले नसते.
काय आहे हेटवणे प्रकल्प
पेणमध्ये पूर्व दिशेला हेटवणे मध्यम प्रकल्प आहे. धरणाची एकूण पाणी पातळी 83 मीटर इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सिंचनासाठी आधीच पाणी आरक्षित करण्यात आले आहे. 88 दशलक्ष घनमीटर सिंचनाचे पाणी आरक्षित आहे, तर उरलेले पाणी सिडकोने नवी मुंबईसाठी वापरले आहे. तरी देखील मोठया प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक असतो. रायगड जिल्हयातील इतर धरणांचा विचार करता हेटवणे धरणाचा पाणीसाठा हा मुबलक आहे.
19 किमीचा कालवा पूर्ण
6,668 हेक्टर क्षेत्रावरील भातशेती व 52 गावांचा हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश आहे. यापैकी धरणापासून 19 किलोमीटरपर्यंतच लांब कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. येथील शेतकरी वर्षभर पिके घेत आहेत. मात्र, उत्तरेकडे हमरापूरपर्यंत कालव्याचे काम झालेले आहे. परंतु आंबेघरच्या पुढे काम ठप्प आहे. खारेपाटात कणे गावाच्या हद्दीत काही प्रमाणात काम झाले आहे. तसेच, दक्षिणेकडे रोडे, कांदळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कालव्याचे काम पुर्ण झाले असून उन्हाळयाच्या दिवसात पाणी पोहोचते.
आंदोलनाचा सकारात्मक परिणाम
वाशी गावात नुकतेच नऊ दिवस उपोषण करण्यात आले होते. हा प्रश्न विधीमंडळ अधिवेशनात शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मांडला होता. त्यानंतर नवीन वर्षामध्ये हा प्रश्न सोडवितो, असे जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार आता निधी प्राप्त करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे फाईल पाठविली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
Exit mobile version