। काबूल । वृत्तसंस्था ।
अमेरिकेने देश सोडल्यानंतर आता तालिबानकडून सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. त्यातच आता शुक्रवारी तालिबान सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 3 सप्टेंबरला शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी तालिबान आपले सरकार स्थापन करणार असल्याची माहिती इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामधून समोर आली आहे.
आता तालिबानने हिबतुल्लाह अखुंदजादा हा आपला प्रमूख नेता असल्याचे घोषित केले आहे. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या हवाल्याने, तालिबान नेता ईनामुल्लाह समनगनीने स्पष्ट केले की, हिबतुल्लाह अखुंदजादा हाच तालिबान प्रमुख असून लवकरच तालिबान सत्तेची स्थापना करणार आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी सुरु असलेली चर्चा पुर्ण झाली असून नव्या मंत्री मंडळाबद्दल देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच या सरकारमध्ये तालिबान प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादा यांना महत्वाचे स्थान असेल असेही तालिबानी नेता ईनामुल्लाह समनगनीने स्पष्ट केले आहे.