| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
खांदा वसाहतीतील सेक्टर 6 येथील उद्यानात सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, त्याचा नागरिकांना अपेक्षित फायदा मिळत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उद्यानातील आकर्षण ठरणारे फुलपाखराच्या आकाराचे दिवे अधूनमधूनच सुरू होत असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधुक प्रकाश दिसून येतो.
उद्यानात बसविण्यात आलेला हायमास्ट दिवाही अनेक महिन्यांपासून बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसेच सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले विविध दिवेही पुरेसा प्रकाश देत नसल्याने उद्यानातील अनेक भाग अंधारात राहतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरी परिसरातच पुरेसा प्रकाश नसेल तर एखादी घटना घडल्यास कॅमेऱ्यात नेमके काय दिसणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीबरोबरच पुरेशी प्रकाशव्यवस्था असणेही आवश्यक आहे.
लाखो रुपये खर्च करून उद्यानाचे सुशोभीकरण केले जाते; मात्र त्याची नियमित देखभाल होत नसेल, तर या खर्चाचा उपयोग काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. उद्यानाची देखभाल करणारे कर्मचारी तसेच संबंधित प्रशासनाचे याकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. या गार्डन मध्ये सर्प ही फिरत असतात त्यामुळे पुरेसा प्रकाश महत्वाचा आहे. रात्रीच्या वेळी उद्यानात अंधुक प्रकाश असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बंद असलेले हायमास्ट दिवे तातडीने सुरू करावेत, फुलपाखरू तसेच सुशोभीकरणाचे दिवे नियमित कार्यरत ठेवावेत आणि संपूर्ण उद्यानात पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या सुविधांचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार कधी? असा सवाल आता खांदा वसाहतीतील नागरिकांकडून केला जात आहे.
खांदा वसाहतीतील उद्यान हायमास्ट बंद
