। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशात ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी कर संकलनात वाढ झाली आहे. मागील महिन्यात 1,51,718 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला आहे.
सलग आठव्या महिन्यात देशात जीएसटी 1.4 लाख कोटींहून अधिक जमा झाला आहे. यंदाच्या वर्षात दुसर्यांदा कर संकलनाचा उच्चांक गाठला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलन 1,51,718 कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी हा 26,039 कोटी रुपये इतका होता. तर, राज्यांच्या वाटा हा 33,396 कोटी रुपयांचा आहे.
आयजीएसटी 81,778 कोटी रुपये आहे. यातील 37,297 कोटी रुपये हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे आहे. तर, 10,505 कोटी रुपये हे उपकरातून जमा झाले आहेत. यातील 825 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून जमा झाले आहेत.
महाराष्ट्रातून सर्वाधिक कर संकलन
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रातून झाले. महाराष्ट्रातून 23 हजार 37 कोटींचा जीएसटी जमा झाला. तर, कर्नाटकमधून 10 हजार 996 कोटींचा कर जमा झाला. गुजरात राज्यातून 9469 कोटींचा जीएसटी जमा झाला. उत्तर प्रदेशातून 7839 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला.