उरणच्या इतिहासाला राष्ट्रीय अधिवेशनात उजाळा

| उरण | वार्ताहर |

कोकण इतिहास परिषदेचे 13वे राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते. सदर परिषदेत विविध विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या अधिवेशनात उरण तालुक्याच्या इतिहासाला उजाळा देणारे दोन शोधनिबंध सादर झाले. इतिहास संशोधक डॉ.अंजय धनावडे (महाड) व तुषार म्हात्रे (पिरकोन, उरण) यांच्या उरण येथील शिलाहारकालीन नौकायुद्ध या शोधनिबंधाची निवड या परिषदेस झाली होती.

पुनाडे येथील अनोख्या वीरगळाची अभ्यासपूर्ण मांडणी या शोधनिबंधात करण्यात आली होती. उरणच्या इतिहासात मोलाची भर घालणारा या शोधनिबंधाचा समावेश परिषदेत प्रकाशित झालेल्या कनक या पुस्तकात करण्यात आला आहे. यासह युवा संशोधक अभिषेक ठाकूर (दिघोडे, उरण) यांच्या उरण तालुक्यातील भूसंपादन विरोधी लढा: शेतकऱ्यांचा सहभाग या शोधनिबंधाचे वाचन संपन्न झाले. सदर शोधनिबंधाचा समावेश कोकण इतिहास परिषदेच्या ई-बुक मध्ये करण्यात आला आहे.

उरण तालुक्याच्या इतिहासावरील शोधनिबंधाच्या उच्च स्तरावरील सादरीकरणामुळे येथील संशोधनवृत्तीस चालना मिळून स्थानिकांच्या इतिहास विषयक दृष्टीकोनात सकारात्मक बदल होतील, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version