महामार्गावरील कर्मचारी ठरताहेत देवदूत

वर्षभरात वाचवले 38 अपघातग्रस्तांचे प्राण

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

अपघातग्रस्ताना त्वरित मदत उपलब्ध व्हावी या हेतूने नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या माध्यमातून घटना व्यवस्थापन पथक तयार करण्यात आल आहे. तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या पथकातील कर्मचार्‍यांच्या मदतीमुळे 2023 या वर्षात जेएनपीटी महामार्गावर घडलेल्या अपघातात 38 जणांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे घटना व्यवस्थापन पथकातील कर्मचारी अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरत आहेत. उरण-जेएनपीटी महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनाचा प्रवास वेगवान आणि सुखकर व्हावा यासाठी एनएचएआय प्रयत्न करत आहे. याकरिता एनएचएआयच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देता यावी याकरिता कळंबोली सर्कल ते डी पॉईंट तसेच पळस्पा फाटा ते डी पॉईंटदरम्यानच्या 11 किलोमीटरच्या मार्गावर विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या मदतीमुळे 2020 आणि 2022 या वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 55 अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. तर, 2023 या वर्षात आतापर्यंत 38 जणांचे प्राण वाचवले आहेत.

नवी मुंबई, कळंबोली सर्कल तसेच पनवेल पळस्पे फाटा येथून जेएनपीटी बंदराला जोडणार्‍या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय 2014 साली घेण्यात आला होता. जेएनपीटी आणि नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या संयुक्त माध्यमातून बांधण्यात आलेल्या या महामार्गावरील प्रवास वेगवान होत आहे. अशा वेळी घडणार्‍या अपघाताप्रसंगी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवता यावी, या हेतूने एनएचआयकडून महामार्गावर प्रत्येक दोन कि.मी. अंतरावर एसओएस बूथ (सर्व्हिस ऑफ सॅटेलाईट) यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेचा वापर करणार्‍या अपघातग्रस्ताला तात्काळ मदत मिळावी यासाठी डी पॉईंट या ठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवली जात असल्याने अनेकांचे प्राण यामुळे वाचले असल्याची माहिती कंट्रोल रूममध्ये कार्यरत असलेले अधिकारी राजू बांदन यांनी दिली आहे.

सद्यःस्थितीत 11 कि.मी.वरच सेवा कार्यरत
कळंबोली सर्कल ते जेएनपीटी बंदर तसेच पळस्पे फाटा ते जेएनपीटी बंदर या जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतराच्या महामार्गावर कळंबोली सर्कल ते डी पॉईंट, पळस्पे फाटा ते डी पॉईंट या 11 कि.मी.च्या अंतरावरच सध्या अपघातग्रस्तांना पथक तात्काळ मदत पोहोचवू शकत आहे. भविष्यात संपूर्ण महामार्गावर अशा रीतीने तात्काळ मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

16 कर्मचारी तैनात
एनएचएआयतर्फे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवता यावी याकरिता तयार करण्यात आलेल्या पथकात 16 कर्मचारी तैनात आहेत. त्यासोबत डी पॉईंट येथे 24 तास सुविधा पुरवण्यासाठी एक रुग्णवाहिका,1 पेट्रोलिंग व्हॅन आणि 1 क्रेन तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवण्याचे कामदेखील करण्यात येत आहे.

तात्काळ मदतीसाठी
पावसाळ्यात अनेकदा एसओएस बूथ प्रणालीत बिघाड होत असल्याने या बूथवर अपघातग्रस्तांकरिता इमर्जन्सी क्रमांक देण्यात आला आहे.

Exit mobile version