हिंद टर्मिनलची मुजोरी

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;

सांडपाणी सोडल्याने सहा एकर भातशेती नापीक

| उरण | प्रतिनिधी |

औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार चिरनेर गावात उघड झाला आहे. येथील हिंद टर्मिनल या माल हाताळणी प्रकल्पातून (कंटेनर यार्ड) जाणूनबुजून सांडपाणी भातशेतीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे सुमारे सहा एकर भातशेती नापीक होण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

चिरनेर गावातील शेतजमिनींमध्ये सांडपाण्याचे तवंग स्पष्ट दिसून येत असून, पिकांची वाढ खुंटली आहे. भात रोपांची पाने पिवळी पडून शेत ओसाड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी चिरनेर ग्रामपंचायत तसेच तहसील कार्यालय उरण येथे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप संबंधित प्रकल्पाविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
उरण तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अनेक कंपन्या आणि कंटेनर यार्ड स्थायिक झाली आहेत. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून नैसर्गिक पाणलोट क्षेत्रांवर भराव टाकणे, जलस्त्रोत बुजवणे आणि पर्यावरणीय अटींची पायमल्ली करणे, असे प्रकार वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. चिरनेर व कळंबुसरे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या हिंद टर्मिनल प्रकल्पाबाबतही असेच आरोप होत आहेत.

स्थानिक शेतकरी विजय रामदास म्हात्रे व इतरांनी आपल्या शेतजमिनी प्रकल्पासाठी संपादित करून देण्यास नकार दिल्याने प्रकल्प व्यवस्थापनाने त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. पारंपरिक रहदारीचा रस्ता बंद करणे, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवणे आणि अखेर यार्डमधील दूषित पाणी शेतात वळवणे, असे प्रकार जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. “आमच्या पिढ्यानपिढ्या कसलेल्या जमिनी उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जात आहे. सांडपाण्यामुळे भातशेती पूर्णपणे नापीक होत आहे. तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही,” अशी व्यथा विजय म्हात्रे यांनी व्यक्त केली. दूषित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत असून, भविष्यात शेती करणे अशक्य होईल, अशी भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकारामुळे चिरनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून प्रदूषण करणाऱ्या हिंद टर्मिनलवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतीचा बळी दिला जात असल्याची भावना बळावत असून, वेळेत कारवाई न झाल्यास चिरनेरमध्ये मोठा उद्रेक होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version