शेकडो एकर भातशेती पाण्याखाली;गावाला पाण्याचा वेढा
। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील खोपटे खाडीच्या बांधाची वेळेवर दुरुस्ती केली नसल्याने या बांधाला मोठे भगदाड पडले असून त्या भगदाडातून भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी पिकत्या भातशेती मध्ये घुसले आहे. परिणामतः शेतकर्यांची शेकडो एकर पिकती भातशेती नापीक झाल्याने शेतकर्यांवर उपासमारीच संकट ओढावणार आहे. त्यातच खोपटा गावातील घरांनाही वेढा समुद्राच्या पाण्याने घातला असल्याने खोपटे गाव समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनानेच संकटाची वेळीच दखल घेवून खाडीच्या बांधाला पडलेले भगदाड बुजवावे अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
खोपटे गाव खाडीकिनारी वसले आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला शेकडो एकर भातशेती असून बहुतेक भातशेती खोपटे खाडी किनारी आहे.या भात शेतीतून उत्पन्न घेवून येथील शेतकरी आपला चरितार्थ चालवतात.शेतात पिकणारा तांदूळ व खाडीतील मासे यावर चरितार्थ चालविणार्या शेतकर्यांच्या भातशेतीचे अलीकडेच खाडीच्या पाण्याने मोठे नुकसान केले आहे. खारबंदिस्ती खारभूमी विभागाकडे असूनही खोपटे खाडीच्या बांधाची दुरुस्ती केली नसल्याने खाडीला आलेल्या उधानामुळे खाडीच्या बांधाला मोठे भगदाड पडल्याने हे पाणी शेकडो एकर भातशेती मध्ये घुसले आहे.
खारे पाणी भातशेतीत घुसल्याने ती आता नापिक झाली आहे.शेतकर्यांच्या हातचे उत्पन्न मातीमोल झाल्याने गरीब शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.खाडीला पडलेले भगदाड अजून बुजविले नसल्याने हे समुद्रातील पाणी आता खोपटे गावात शिरले असून त्याने गावातील घटना वेढा घातला आहे.त्यामुळे या गावातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असून खाडीच्या बांधाचे भगदाड लवकरात लवकर दुरुस्त करा.
सत्यवान भगत, मनसेचे तालुकाध्यक्ष
खोपटे भागात खार बंदिस्ती फुटल्या असतील तर त्यांची पाहणी करून त्याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सर्व शेती वाचविली जाईल.
सुरेश सावंत
कार्यकारी अभियंता, खारभूमी विभाग