ई टॉयलेट धूळ खात, साहित्याची चोरी
| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पे अँड युज या तत्वावर स्वच्छ भारत सर्वेक्षणा अंतर्गत पालिके तर्फे 20 ठिकाणी ई टॉयलेट उभरण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयी साठी उभारण्यात आलेले हे टॉयलेट बंद अवस्थेत असून, पालिकेचे हे ई टॉयलेट म्हणजे असून सोय, नसून खोळंबा असा प्रकार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणात सहभागी पनवेल पालिके तर्फे पालिका हद्दीतील चारही प्रभागातील विविध भागात सार्वजनिक शौचालय आणि मुतार्या बांधण्यात आल्या आहेत. उघड्यावर केल्या जाणार्या शौचविधीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि प्रदूषणापासून मुक्तता या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या या शौचालयानमध्ये 20 ई टॉयलेट चा देखील समावेश आहे.
आधुनिक पद्धतीच्या या ई टॉयलेटसाठी भारत पेट्रोलीयम काँर्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या सिआरएस फंडाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येकी आठ लाख 10 हजार रुपयाना खरेदी करण्यात आलेल्या या टॉयलेट करता जवळपास एक कोटी 62 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.संपूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी असलेल्या आणि अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसवलेल्या या ई टॉयलेटचे दार एक रुपयाचे कॉईन टाकल्यानंतर उघडले जाते. नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने उद्यान व मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेले हे ई टॉयलेट बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाकडून ई टॉयलेट सुरु करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हे टॉयलेट वापरा करता सुरु करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
पालिका स्थापने पूर्वी सिडकोच्या माध्यमातून कळंबोली वसाहतीत सात ठिकाणी ई टॉयलेट उभारले गेले आहेत. जवळपास 50 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या ई टॉयलेट पैकी 5 ई टॉयलेट सुरु करण्यात सिडकोला यश आले होते. पालिका स्थापने नंतर मात्र हस्तानंतरणाच्या मुद्यावरून वापरात असलेल्या या ई टॉयलेट च्या दुरुस्ती आणि देखभाला कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सिडको चे हे टॉयलेट नादुरुस्त झाले असून, टॉयलेट मधील साहित्याची देखील चोरी करण्यात आल्याच पाहायला मिळत असून,काही टॉयलेटचा वापर मद्यपी मद्यपानासाठी करत आहेत.
वीज देयक मात्र वेळेत
पालिका आणि सिडको तर्फे उभारण्यात आलेले ई टॉयलेट बंद अवस्थेत असले तरी या टॉयलेट करण्यात आलेल्या वीज पुरवठ्या पोटी अकराण्यात येणारे देयक मात्र दोन्ही संस्था वेळेत भरत असल्याचे चित्र मीटर क्रमांकांच्या क्रमांका वरून स्पष्ट होत आहे.
सिडको तर्फे उभारण्यात आलेल्या ई टॉयलेट चे हस्तानंतरण पालिके कडे केले जाणार आहे. पालिकेने हे टॉयलेट दुरुस्ती करून मागितले तर सिडको या बाबत विचार करेल.
विलास बनकर,
वरिष्ठ अभियंता. सिडको.