। गडब । वार्ताहर ।
जयभवानी क्रीडा मंडळ कोप्रोली आयोजित रायगड जिल्हास्तरीय महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेत हिरकणी स्पोर्ट्स गडब या संघाने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेतील अंतिम सामना हिरकणी गडब विरुद्ध टाकादेवी मांडवा या संघादरम्यान झाला. हिरकणी गडब संघाच्या राष्ट्रीय खेळाडू ऋणाली मोकल हिने आक्रमक चढाया केल्या. तर राष्ट्रीय खेळाडू राधिका पाटील हिने आकर्षक पकडी, तर कोपरारक्षक सावली गोरे, मध्यरक्षक साक्षी पाटील, नेहा मोकल यांनीदेखील आकर्षक पकडी केल्या. श्रावणी पाटील, तनुजा पाटील, कीर्ती ठाकूर, दीप्ती मोकल, हर्षली पाटील, श्रद्धा पाटील, यज्ञेशा मोकल, कनिष्का पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर मांडवा संघाकडून राष्ट्रीय खेळाडू नमिषा म्हात्रे हिने आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु तिचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर हा सामना गडब संघाने 11 गुणांनी जिंकून विजेतेपद मिळविले. या स्पर्धेला राजिपचे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन मोकल, सहकार्यवाह संजय मोकल, सदस्य पांडुरंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमृत म्हात्रे यांनी भेट देऊन खेळांडूना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक हिरकणी गडब, द्वितीय क्रमांक टाकादेवी मांडवा, तृतीय क्रमांक ओमकार वेश्वी, चतुर्थ क्रमांक दत्तात्रेय पनवेल, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ऋणाली मोकल (गडब), चढाई- ईशा पाटील (वेश्वी), पकड- निमिशा म्हात्रे (मांडवा), पब्लिक हिरो- हर्षदा पाठारे (पनवेल) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष जे.जे. पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य जनार्दन पाटील, सरपंच विकास पाटील, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष यशवंत पाटील, विश्वनाथ पाटील, लीलाधर म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, नितीन भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषके देण्यात आली.







