| वावोशी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील होराळे आणि आपटी ग्रामपंचायत हद्दीच्या सीमेलगत सध्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि मातीच्या भरावाचे काम सुरू आहे. या भरावामुळे परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेला पारंपरिक नैसर्गिक नाला आधीच भराव टाकून बंद करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या नाल्यालगत काही अंतरावर असलेली प्राचीन चौकोनी आकाराची विहीर आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, या ऐतिहासिक ठेव्याकडे स्थानिक ग्रामस्थ किंवा संबंधित यंत्रणांचे अद्याप गांभीर्याने लक्ष गेले नसून या ठिकाणी उत्खनन, भराव आणि बंद करण्यात आलेला नैसर्गिक नाला यासोबतच प्राचीन स्थापत्यशैलीतील ही विहीर निदर्शनास आली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, ही विहीर अहिल्याबाई होळकर यांच्या कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. विहिरीच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले कोरीव दगडी चिरे, चौकोनी आकाराची रचना आणि पारंपरिक स्थापत्यशैली पाहता ही वास्तू ऐतिहासिक वारसा असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत पडून असलेल्या या विहिरीकडे प्रशासनाने कोणतेही संवर्धनात्मक पाऊल उचलले नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेले भरावाचे काम विहिरीच्या अगदी काठापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ या ठिकाणाची पाहणी करून संबंधित ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आधीच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही प्राचीन विहीर पडीक अवस्थेत पोहोचली आहे. अशातच आता सुरू असलेल्या उत्खनन आणि भरावामुळे हा ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट
