न्यूझीलंड संघाने रचला इतिहास

12 वर्षानंतर भारत मायदेशात पराभूत

। पुणे । प्रतिनिधी ।

न्यूझीलंड क्रिकेट संघाने शनिवारी (दि.26) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इतिहास रचला आहे. न्यूझीलंडचा हा भारतातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. यापूर्वी त्यांना भारतात कधीही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. तसेच, त्यांनी भारतात कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही चौथीच वेळ आहे.

भारतीय संघ गेल्या 12 वर्षात मायदेशात सलग 18 कसोटी मालिकेत पराभूत झालेला नव्हता. मात्र, न्यूझीलंडने भारताचा विजयीरथ रोखला आहे. त्यांनी तब्बल 12 वर्षांनी आणि 18 कसोटी मालिकांनंतर भारतीय संघाला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. भारतीय संघ मायदेशात अखेरचा 2012 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत झाला होता. न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसर्‍या कसोटीत तिसर्‍याच दिवशी 113 धावांनी विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली आहे. यामुळे आता न्यूझीलंडने मालिकाही खिशात घातली आहे. न्यूझीलंडच्या या विजयात मिचेल सँटेनरने 13 बळी घेत मोलाचा वाटा उचलला आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 60.2 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान, भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, 6 व्या षटकात कर्णधार रोहित 8 धावा करून मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डाव सावरण्याबरोबरच धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली. त्यांनी त्यांची अर्धशतकी भागीदारीने न्यूझीलंडला दबावात टाकले होते. लंच ब्रेकनंतर 16 व्या षटकात सँटेनरने शुभमन गिलला गिल 23 धावांवर बाद केले. त्याची जैस्वालसोबतची 62 धावांची भागीदारीही तुटली. यानंतरही जैस्वाल आणि विराट कोहली यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. जैस्वालने अर्धशतकही पूर्ण केलेलं होतं. पण जैस्वाललाही 77 धावांवर सँटेनरने झेल बाद करत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर मात्र भारताची फलंदाजी आणखी गडगडली. मात्र, रविंद्र जडेजाने भारताला जिंकण्यासाठी जिद्द दाखवली खरी, परंतु, जडेजा 61 व्या षटकात 42 धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव संपला. या डावात न्यूझीलंडकडून मिचेल सँटेनरने सर्वाधिक 6 बळी घेतले. तर, अजाज पटेलने 2 बळी आणि ग्लेन फिलिप्सने 1 बळी घेतला.

Exit mobile version