झिम्बॉब्वेने रचला इतिहास

वॉशिंग्टन सुंदरची झुंज अपयशी

। हरारे । वृत्तसंस्था ।

भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील शनिवारी (दि.6) झालेला पहिला टी-20 सामना रोमहर्षक झाला. झिम्बॉब्वेने विश्‍वविजेत्या भारताला 13 धावांनी पराभूत केले. भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेला शनिवार पासुन सुरुवात झाली. टी-20 विश्‍वचषक विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली सामना खेळत होता. या सामन्यात झिम्बॉब्वेने भारतापुढे विजयसाठी 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुझरबनी आणि चटाराने शेवटच्या दोन षटकांत केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला 13 धावांनी पराभूत केले.

दरम्यान, भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रवि बिश्‍नोई (4 बळी) आणि वॉशिंग्टन सुंदरने (2 बळी) दमदार गोलंदाजी केली. या दोघांनी सहा बळी घेतले. तर, वेस्ली मधेवेरे, ब्रायन बेनेट्ट, मैडेंडे आणि डायोन मायर्स यांनी चांगली फलंदाजी केली. झिम्बॉब्वेचा विकेटकीपर मैडेंडेनं 29 धावा केल्याने त्यांनी 115 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या पाच षटाकंत 30 धावा केल्याने झिम्बॉब्वेला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. झिम्बॉब्वेने 20 षटकांत 9 गडी गमावत 115 धावा केल्या.

झिम्बॉब्वेने भारतापुढं विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य ठेवलं होते. या धावसंख्येंचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला अभिषेक शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला. यानंतर अनुभवी खेळाडू ऋतुराज गायकवाड 7 धावा करत बाद झाला. पदार्पण करणार्‍या रियान परागला मोठी खेळी करण्यात अपयश आले. परागला चटाराने 2 धावांवर असताना बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने मोठी निराशा केली. तो शुन्यावर बाद झाला. ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल डाव सावरतील असे वाटत असतानाच ध्रुव जुरेल 6 धावा करुन बाद झाला. यानंतर कर्णधार शुभमन गिल 31 धावांवर बाद झाला. झिम्बॉब्वेच्या सिकंदर रझा, तेंदाई चटारा, ब्रायन बेनेट्ट, वेलिंग्टन मस्कदझा, ब्लेसिंग मुझरबनी, ल्यूक जोंगवे यांनी भारताच्या फलंदाजांना रोखले. सिकंदर रझानं 3 तर, चटाराने 2 बळी घेतले.

Exit mobile version