| नॉर्वे | वृत्तसंस्था |
भारताचा विश्वविजेता खेळाडू डी. गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात विजेता होण्याची संधी गमावली आहे. अखेरच्या फेरीआधी डी. गुकेश व मॅग्नस कार्लसन यांच्याकडे जेतेपदाची संधी होती. मात्र, दहाव्या फेरीत फॅबियानो कारुआनाविरुद्ध खेळताना दबावाखाली गुकेशकडून चुका घडल्या. कार्लसनने मात्र अर्जुन एरीगेसी याला बरोबरीत रोखले व सातव्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला आहे.
डी. गुकेश-फॅबियानो कारुआना यांच्यामधील लढतीत दोन्ही खेळाडूंकडून चुका घडल्या. गुकेशकडून अव्वल दर्जाचा खेळ झाला नाही. त्यामुळे कारुआनाकडे विजयाची संधी होती; परंतु, त्याच्याकडून छान चाली करण्यात आल्या नाहीत. तरीही विजयामुळे कारुआना याला तीन गुणांची कमाई करता आली. सामना संपल्यानंतर गुकेशच्या चेहऱ्यावर निराशा प्रकर्षाने दिसून येत होती. मॅग्नस कार्लसन व अर्जुन एरीगेसी यांच्यामधील लढतीवरही सर्वांचे लक्ष होते. अर्मागेडॉन टायब्रेकमध्ये अर्जुनने विजय साकारला. मात्र, त्यानंतर कार्लसनने अर्जुनला ड्रॉवर रोखले. त्यामुळे जेतेपदासाठी लागणारा एक गुण कार्लसनला मिळवता आला. हा एक गुण अत्यंत महत्त्वाचा ठरला.