| पुणे | प्रतिनिधी |
महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रंगतदार सामने होत आहेत. रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर स्मॅशर्स संघात शुक्रवारी (दि.6) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असो. स्टेडियमवर रोमांचक सामना झाला. या सामन्यात सोलापूर स्मॅशर्सच्या शरयू कुलकर्णीने केलेले सेलिब्रेशन मात्र चर्चेचा विषय ठरला. यासोबतच मानधनानेही तिच्या खिलाडूवृत्तीने मने जिंकली.
या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. मात्र, दुसऱ्याच षटकात शरयू कुलकर्णीने त्यांना मोठा धक्का दिला. कर्णधार स्मृती मानधनाला बाद केले. परंतु, ही विकेट दोन वेगळ्या कारणाने चर्चेत राहिली. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर शरयूने टाकलेल्या चेंडूवर स्मृतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडू यष्टीरक्षक दामिनी बनकरने झेलला. त्यामुळे सोलापूरच्या संघाने जोरदार अपील केले; मात्र, अंपायरने हा चेंडू आधी वाईड असल्याचा इशारा केला. परंतु, स्मृतीने खिलाडूवृत्ती दाखवली आणि चेंडू तिच्या बॅटला लागल्याचे सांगत ती मैदानातून बाहेर गेली. त्यामुळे ती बाद झाल्याचे पाहाताच शरयूने कोलांटी उडी मारत सेलिब्रेशन केले. हा तिचा या सामन्यातील पहिलाच चेंडू होता आणि त्यावर तिला बळी मिळाला होता. दरम्यान, शरयूने सामन्यानंतर सांगितले की रिषभ पंतकडून सेलिब्रेशनची प्रेरणा घेतली. रिषभ पंतने आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतक केल्यानंतर कोलांटी उडी मारत सेलिब्रेशन केले होते.