21 वर्षीय कोको ठरली फ्रेंच राणी
| पॅरिस | वृत्तसंस्था |
फ्रेंच ओपन 2025 स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद अमेरिकेच्या कोको गॉफने जिंकले आहे. अफलातून पुनरागमन करत तिने अव्वल मानांकित अरिना सबलेंकाला अंतिम सामन्यात मात देत दुसरे ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले आहे. 21 वर्षांच्या कोको गॉफचे हे एकेरीतील पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद आहे.
फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित गॉफने सबलेंकाला 6-7, 6-2,6-4 अशा तीन सेटमध्ये पराभूत करत हे विजेतेपद जिंकले. पहिल्या सेटमध्ये सबलेंकाने 4-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, गॉफनेही झुंज दिली. हा सेट गॉफने टाय ब्रेकमध्ये गमावला. पहिला सेट तब्बल 1 तास 17 मिनिटे चालला. त्यानंतर गॉफने अफलातून पुनरागमन करत दुसरा सेट सहज जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोघी एकमेकींना टक्कर देत होत्या. यादरम्यान सबलेंकाने एक मॅच पाँइंटही वाचवला. मात्र, गॉफने अखेरची लढाई जिंकली आणि फ्रेंच ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले.
सर्वात युवा अमेरिकन टेनिसपटू
कोको गॉफने यापूर्वी 2023 मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद जिंकले आहे. तसेच, गॉफचा हा सबलेंकाविरुद्धचा 11 सामन्यांतील 6 वा विजय होता. याशिवाय सेरेना विल्यम्सनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली अमेरिकन महिला टेनिसपटू आहे. सेरेनाने शेवटचे फ्रेंच ओपन 2015 साली जिंकले होते. याशिवाय सेरेना विल्यम्सने पहिल्यांदा 2002 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी गॉफ सर्वात युवा अमेरिकन टेनिसपटू ठरली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर कायम
गॉफने जरी हे विजेतेपद मिळवले असले तरी ती जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कायम राहणार आहे. तिला या विजेतेपदानंतर 2हजार गुण मिळाले आहेत. तसेच, गॉफला 2,550,000 युरो (जवळपास 24.94 कोटी) बक्षीस म्हणून मिळाले आहेत. सबलेंका या उपविजेतेपदानंतरही पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. उपविजेतेपदाबद्दल तिला बक्षीस म्हणून 1,275,000 युरो (जवळपास 12.47 कोटी) मिळाले आहेत.