आरसीबीवर बीसीसीआयची टांगतील तलवार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलचे अजिंक्यपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का देत बंगळुरू नवे आयपीएल विजेते ठरले आहेत. त्यामुळे विराट कोहलीसह संपूर्ण संघाने जोरदार सेलिब्रेशनही केले. हाच आनंद संघाला घरच्या चाहत्यासोबत म्हणजेच बंगळुरूमध्ये साजरा करायचा होता. मात्र, त्यांच्या या सेलिब्रेशनला गालबोट लागले आहे.
बंगळूरूच्या विजेतेपदानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि.4) आरबीसीचे खेळाडू बंगळुरूत दाखल झाले. त्यांचा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गौरव करण्यात आला. परंतु, यावेळी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. गर्दी इतकी झाली होती की त्यात चेंगराचेंगरीची घटना घडली असून त्यात 11 जणांनी प्राण गमावले, तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे या सेलिब्रेशनवर अनेक स्थरातून टीका होत आहे. त्याला जबाबदार कोण, अशा चर्चा देखील होत आहेत. तसेच, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन, कर्नाटक सरकार व आरसीबी असे सर्वच टीकेचे धनी ठरत आहेत.
दरम्यान, प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबाला कर्नाटक सरकार आणि आरसीबी यांनी मदतीची घोषणाही केली आहे. परंतु, हे प्रकरण आता चिघळताना दिसत आहे. त्यातच कर्नाटक क्रिकेट असो.च्या दोन अधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले असून आरसीबी संघाचा मार्केटिंग प्रमुख निखील सोसाले याला अटकही झाली आहे. त्यामुळे आरसीबी संघही या प्रकणात अडचणीत सापडला आहे. अशातच आता आरसीबी संघावर आयपीएल 2026 मध्ये बंदी येऊ शकते, अशा चर्चांना देखील उधाण आलं आहे.
बीसीसी आयची कोंडी
या घटनेमुळे बीसीसीआय देखील कोंडीत सापडले आहे. कारण आयपीएल ही एक अब्जावधींचा व्यावसाय असणारी स्पर्धा आहे. अशात काहीच कारवाई केली नाही, तर ते बीसीसीआयसाठी कठीण होऊ शकते. दरम्यान, बीसीसीआयने या विजय सोहळ्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी यावर काही कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट केले नव्हते. आयपीएलमधील फ्रँचायझीचे कामकाज या व्यावसायिक संस्थांप्रमाणे चालते. तरी त्यांचे कामकाज हे बीसीसीआयच्या करारांच्या नियंत्रणात असेते. या करारामध्ये सार्वजनिक सुरक्षेबाबतही तरतुदी असतात.
बंदीची दाट शक्यता
जर या प्रकरणाच्या तपासात आरसीबीच्या व्यवस्थापनाची चूक आढळली आणि त्यांचे गंभीर दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले, तर बीसीसीआय कठोर पावले उचलू शकतात. त्यांना केवळ न्यायासाठी नाही, तर स्पर्धेच्या प्रतिष्ठेसाठीही पावले उचलावी लागणार आहेत. त्यातच या प्रकरणात लोकांचे जीव गेल्यानंतर ही घटनेला गंभीर स्वरुप मिळाले आहे. त्यामुळे जर तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या, तर आरसीबीवरील बंदीची शक्यता नाकारता येणार नाही.