| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. एलपीजी गॅस टँकर आणि प्रवासी मिनी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला. टँकरच्या जोरदार धडकेनंतर मिनी बस दरीत कोसळली, तर टँकरमधून गॅस लीक होऊन आजूबाजूच्या परिसरात आग लागली. मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीकडे जाणारा एलपीजी गॅस टँकरने चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या मिनी बसला मागून धडक दिली. या जोरदार धडकेमुळे मिनी बस 40 फुट खोल दरीत कोसळली तर टँकर रस्त्याच्या बाजुला पलटी झाला. या अपघातामुळे टँकर मधून गॅस गळती सुरु झाल्याने परिसरात असलेल्या एका घराला व गुरांच्या चा-याला आग लागली. त्यात एक म्हैस भाजली. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झालीने घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत 31 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. टँकरच्या धडकेनंतर मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळली. अपघातातील जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आल्याने ही वाहतुक पाली संगमेश्वर मार्गे वळविण्यात आली. टँकरमधून सुरू असलेल्या गॅस गळतीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसर रिकामा केला. तसेच टँकर काढल्यानंतर दुपारी उशिरा महामार्गावरील वाहतुक सुरूळीत करण्यास पोलिसांना यश आले. महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेले मिनी बस मधील प्रवासी हे रत्नागिरीत सुरु असलेल्या शिक्षक प्रशिक्षणासाठी या वडापच्या गाडीतून येत होते. गेले काही दिवस हे प्रशिक्षण सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.