दिवाळीपूर्वी मिळणार दुसरा गणवेश; गणवेशासोबत मिळणार बूट, सॉक्स
। रायगड । सुयोग आंग्रे ।
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. पहिली ते आठवीच्या तब्बल 98 हजार 572 विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश देण्याचा कार्यक्रम शाळेच्या पहिल्या दिवशीच पार पडणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 16 जून रोजी एक गणवेश, बुटाचा एक जोड व सॉक्सच्या दोन जोडी मिळणार आहेत. त्यासाठीचा निधी शासनाकडून वितरित झाला आहे. संपूर्ण पावसाळा विद्यार्थ्यांना केवळ एका गणवेशावरच काढावा लागणार आहे. कारण, दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी देण्याबाबतचे नियोजन शासनस्तरावर सुरु आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सध्या पहिल्या गणवेशाची शिलाई युद्धपातळीवर सुरू आहे. 20 दिवसांपूर्वी शासनाकडून आलेला गणवेश, सॉक्स, बुटासाठीचा निधी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गणवेशाची शिलाई पूर्ण झाल्यानंतर व सॉक्स, बूट खरेदी केल्यानंतर त्याची पावती जोडून गटशिक्षणाधिकार्यांकडे द्यायची आहे. त्यानंतर त्यांच्याकडून संबंधितांना तो निधी वितरित होईल. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळायलाच हवा, असे निर्देश शिक्षणाधिकार्यांनी गटशिक्षणाधिकारी व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.
पहिला गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी, तर दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी मिळणार आहे. त्यामुळे पहिला गणवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आठवडाभर तोच गणवेश घालून शाळेत यावे लागणार आहे. वास्तविक पाहता, दोन्ही गणवेशात किमान एक महिन्याचा फरक असणे आवश्यक आहे; पण निधीअभावी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दुसर्या गणवेशासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. एका गणवेशाचा सहाय्याने विद्यार्थी शाळेत येणार आहे. रायगड जिल्हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार जिल्हा आहे. यामुळे या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दोन गणवेश शाळा सुरु होताना मिळणे अपेक्षित होते. एक गणवेश पावसाच्या पाण्याने भिजला, तर दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना परिधान करून शाळेत येणे शक्य झाले असते.
दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी
विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून दोन गणवेश दिले जातात. त्यासाठी शासनाकडून प्रत्येकी 600 रुपयांचा निधी दिला जातो. एक गणवेश शाळेचा, तर दुसरा गणवेश स्काऊट गाइडच्या धर्तीवर मिळणार आहे. तो गणवेश दिवाळीपूर्वी मिळेल, असे नियोजन आहे. सध्या पहिल्या गणवेशाचा निधी शासनाकडून वितरित झाला आहे. हा गणवेशदेखील यंदा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच दिला जाणार आहे. गतवर्षी कापड कटिंग करून तो बचत गटांच्या माध्यमातून शिलाई करून देण्यात आला होता.
चौकट..
तालुकानिहाय पहिल्या दिवशी गणवेश वाटप
अलिबाग- 5,774
कर्जत- 13,079
खालापूर- 8,228
महाड- 5,681
माणगाव- 6,527
म्हसळा- 2,612
मुरूड- 2,877
पनवेल- 24,307
पेण- 7,346
पोलादपूर- 1,620
रोहा- 6,619
सुधागड- 4,149
तळा- 1,484
उरण- 4,800