प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा एल्गार; आझाद मैदानावर आमरण उपोषण
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
पूर्वीची आयपीएल व आत्ताची रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्रधारक भूमीपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी मागील 35 ते 40 वर्षांपासून व्यापक स्वरूपाचा लढा सुरू आहे. रिलायन्सने प्रकल्प प्रमाणपत्रधारकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अन्यथा आमच्या जमिनी परत कराव्यात, असा एल्गार करीत आझाद मैदानावर दि. 11 जूनपासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुन्हा बेमुदत आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारले आहे. रिलायन्सने कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अन्यथा आमच्या जमिनी परत कराव्यात, तसेच नव्याने निर्माण होणार्या प्रकल्पासाठी होणार्या मातीच्या भरावाने आंबा नदीलगत असलेल्या शेतजमिनी व गावातील घरांना महापुराचा धोका ओढवणार आहे. यासंदर्भात नुकसानभरपाईविषयी महत्त्वपूर्ण निर्णायक बैठक घेण्यात यावी, या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. आता आरपारची लढाई असून, या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवून आंदोलन अधिक अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त, स्थानिक शेतकरी, भूमीपुत्र यांनी बहुसंख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने, सचिव राकेश जवके, उपाध्यक्ष रोशन जांबेकर, उपाध्यक्ष पुष्पा (रूपा) भोईर यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे जिल्हा रायगड कंपनी प्रकल्पबाधित शेतकरी कुटुंबातील प्राधान्य प्रमाणपत्रधारकास कंपनी प्रकल्पामध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळावी आणि नवीन प्रोजेक्ट कामात माती भरावाच्या कामाने अंबा नदीलगत असलेल्या तलाठी सजा बेणसे अंतर्गत येणार्या शेतजमिनी आणि गावातील घरे यांचे पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर होणार्या नुकसानीविषयी अंतिम निर्णायक बैठक मुख्यमंत्री यांनी आपल्या अध्यक्षतेत मंत्रालय मुंबई येथे घेण्यात येईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेत घेतलेल्या 5 मार्च 2025 रोजीच्या बैठकीत अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनीधी यांस चर्चा करून आश्वासीत केले होते, तसे बैठकीचे इतिवृत्तांमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी उद्योग विभागतर्फे पुढील निर्णायक कार्यवाहीकरिता गॅस 2024/ प्र. क्रमांक-42 (भाग-2)/उद्योग 10 ची नस्ती (फाईल) मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली आहे. आपल्या कार्यालयात विचारणा केली असता फक्त आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात निर्णायक बैठक घेणेकामी तारीख, वेळ सूनिश्चीत करण्यात येत नाही. प्रलंबित प्रश्न मार्गस्त होणेकामी निर्णायक बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत घेणेकामी आपल्या कार्यालयामार्फत चालढकल होत असल्या कारणास्तव दि. 11 जूनपासून पुढे आझाद मैदान मुंबई येथे सर्व प्रकल्पबाधित प्रमाणपत्रधारकांच्या उपस्थितीत आणि अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बेमुदत आमरण उपोषण करत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अध्यक्षतेत निर्णायक बैठक घेऊन प्रकल्पबाधित प्रमाणपत्रधारकांचा कायमस्वरूपी नोकरीसंदर्भात न्याय करावा, अशी मागणी रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.