भारत-पाक संघर्षाचा इतिहास

जावेद मियाँदादच्या अखेरच्या चेंडूवरील षटकाराने पाकिस्तानला शारजातील मर्यादित षटकांचा फक्त सामनाच जिंकून दिला नाही तर भारतावर कित्येक वर्षांसाठी मानसिक वर्चस्व गाजविण्याची संधी दिली. चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवरील आघाताचे व्रण एवढे परिणाम करणारे होते की, पाकिस्तानविरुद्ध सामना आला की भारतीय क्रिकेटपटू अक्षरश: थरथरायचे. त्यावेळी भारताकडे प्रतिभावंत खेळाडू होते, पण मानसिक वर्चस्वाचे युद्ध पाकिस्तान संघाने सामन्याआधीच जिंकलेले असायचे.

हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. 1985 च्या बेन्सलन ॲण्ड हेजीस स्पर्धेचे विजेतेपद भारताला 1983 च्या विश्वचषक विजयानंतरचा मोठा कप देऊन गेले. त्यापेक्षाही ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकाविल्यामुळे भीतीचा, मानसिक पराभूत मन:स्थितीचा पगडा भारतीयांच्या मनावरुन उतरला. आणि मग त्यानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध सात सलग सामन्याच्या विजयांची परंपरा सुरु झाली. सुदैवाने त्यापैकी बहुतांशी विजयाची साक्षीदार बनण्याचे भाग्य मला लाभले होते. 1992 च्या ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ प्रथमच एकमेकांपुढे उभे राहिले. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील त्या लढतीच्यावेळी डोकेवर काढत असलेल्या खालिस्तानवाद्यांचा एक मोठा गट पाकिस्तानला ‌‘सपोर्ट’ करीत होता. तो सामना सचिन तेंडुलकरच्या अष्टपैलू खेळामुळे लक्षात राहिला. अझरुद्दीन-अजय जडेजाच्या दुसऱ्या विकेटसाठीच्या 61 धावांच्या भागीदारीनंतर भारताचा डाव सावरला. सचिनच्या नाबाद अर्धशतकाने कपिल सोबतची त्याची 60 धावांची वेगवान भागीदारी भारताला 216 धावसंख्येपर्यंत घेऊन गेली.

आमेर सुहैल आणि जावेद मियाँदादच्या तिसऱ्या विकेटसाठीच्या भागिदारीने पाकिस्तानला विजयाची आशा दाखविली होती. पण सचिनने सुहैलला तंबूचा रस्ता दाखविला आणि पाकिस्तानची गाडी त्यानंतर कधीच विजयाच्या रुळावर आली नाही. यष्टीरक्षक किरण मोरेच्या यष्टीमागील उड्या मारण्याची नक्कल करणारा जावेद मियाँदादही कायमचा लक्षात राहिला. जावेदची एकाकी खेळी संथ होती. त्यामुळे भारताने 43 धावांनी सहज सामना जिंकला. मात्र त्या विजयानंतर भारतीय संघ सुस्तावला. त्या अपयशाचे शल्य पाकिस्तानला जिव्हारी लागले. त्यानंतर जिद्दीने पेटून उठलेल्या पाकिस्तानचे चक्क 1992 च्या वर्ल्डकप जिंकला.

नंतरच्या 1996 च्या भारतातील विश्वचषकात भारताने पाकिस्तानचे स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उपांत्यपूर्व फेरीत बंगळूरु येथील सामन्यात उद्ध्वस्त केले. भारताचे 289 धावांचे आव्हान पाकिस्तानला पेलविलेच नाही. 84 धावांची पाकची सलामीची भागिदारी वेंकटेश प्रसादने संपुष्टात आणली आणि त्यानंतर वेंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळे यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण डावाची कत्तल केली. 1999 च्या विश्वचषक कारगिल युद्ध सुरु असताना झाला. त्यामुळे पाकिस्तानवरील मॅन्चेस्टर येथील सामन्याला अवाजवी महत्त्व आले होते. मॅन्चेस्टरमध्ये पाकिस्तानी लोकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे त्या सामन्यातील भारतीय प्रेक्षकांबरोबरचे त्यांचे खटके व संघर्ष मी जवळून पाहिले होते. सामन्यानंतर परतताना आमच्याही अंगावर काही जण चालून आले होते. पण नेहमीप्रमाणे भारताविरुद्ध झालेल्या पराभव पाकिस्तानला ‌‘लकी’ ठरला. लॉर्डस्‌‍वरील अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारली.

2003 च्या दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकातील वसिम अक्रम-वकार युनुस-शोएह अख्तर हा वेगवान गोलंदाजीची आग ओकणारा तोफखाना अंगावर घेत सचिन तेंडुलकर 98 धावांची एक सदाबहार खेळी करुन गेला. क्रिकेटच्या भात्यातील सर्व फटक्यांचा नजराणा सचिनने त्या डावात पेश केला. थर्डमॅनवरील त्याचा षटकार त्या विश्वचषक स्पर्धेचा एक लॅन्डमार्क ठरला होता. 2007 च्या विश्वचषकात भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांचे प्राथमिक फेरीतील पतन या दोन देशांमधील संघर्षपूर्ण लढतीच्या आनंदापासून तमाम क्रिकेट विश्वाला वंचित करणारे ठरले. त्यानंतर 2011 च्या भारतातील विश्वचषकामधील उपांत्यफेरीचा सामना क्रिकेटचा आहे की आपण दोन्ही देशांच्या सीमारेषेवर उभे आहोत असे वाटावा असा होता. संपूर्ण चंदीगड शहराला लष्करी छावणीचे स्वरुप आले होते. यावेळी युद्ध सीमेवर नव्हते, तर मोहाली क्रिकेट ग्राऊंडच्या परिघामध्ये होते. नेहमीप्रमाणे सचिनने फलंदाजीतील आपले कर्तव्य पार पाडले होते. त्यानंतर झहीरखान, मुनाफ पटेल आदी गोलंदाजांनी भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता.

पाकिस्तानवरील त्या विजयाइतका आनंद साजरा केलेला मी काही पहिला नव्हता. 30 मार्च 2011 च्या त्या रात्री संपूर्ण शहर झोपलेच नाही. रस्त्यारस्त्यावर सर्वजण भांगडा करीत होते, एकमेकांना मिठाई भरवित होते. खाण्याचा आनंद लुटत होते, जणू काही भारताने विश्वचषकच जिंकलाच. तमाम भारतवासियांचे ते स्वप्न खरंही ठरलं. 2 एप्रिलला मुंबईत भारताने श्रीलंकेवर मात करुन विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015 ला ॲडिलेड येथे आणि 2019 ला मॅन्चेस्टरलाच भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.

Email:- vinayakdalvi41@gmail.com

Exit mobile version