एच.आय.व्ही. ग्रस्तांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

। पनवेल । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एआरटी केंद्र लोधिवली, खालापूर येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण, खालापूर यांच्या सहकार्याने कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमास रिलायन्स हॉस्पिटल, लोधीवली संचालक डॉ. रणजित खंदारे, डापकुचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी रायगड जिल्ह्यामधील एचआयव्हीसह जगणार्‍या व्यक्तींना देण्यात येणार्‍या शासकीय सेवा सुविधांबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांना शासकीय सेवा सवलती सहज मिळाव्यात याकरिता संजय गांधी निराधार योजना, जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करून शासकीय सेवा देण्यात येणार आहेत. याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पर्णा बार्डोलोई यांनी एआरटीविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास खालापूर न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश आर.डी.वाबळे व सह दिवाणी न्यायाधीश पी.एम. माने हे हजर होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात एचआयव्हीसह जगणारा व्यक्ती व कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रायगडमधील प्रत्येक तालुक्यातील न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय असल्याची माहिती दिली. संबंधित तालुक्यातील महिलांनी तेथील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामध्ये जाऊन कायदेविषयक मदत घेण्याबाबत आवाहन यावेळी करण्यात आले.

एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे-पनवेल मधील एआरटी केंद्राचे संचालक डॉ.सुधीर कदम यांनी एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे हे सन 1998 पासून एचआयव्ही प्रतिबंधाकरिता कार्य करीत असून आता एचआयव्हीसह जगणार्‍या व्यक्तींना रुग्णालयातच एआरटी केंद्र सुरु करून एआरटी उपचार देत असल्याचे सांगितले.
प्रभारी जिल्हा न्यायाधीश तथा पनवेल सह दिवाणी न्यायाधीश जे.डी.वाडने यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सन 2017 च्या कायद्याबाबत तसेच एचआयव्ही सह जगणार्‍या व्यक्तींना असणार्‍या हक्क व अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, एआरटी केंद्र लोधिवली, खालापूरच्या समुपदेशक तारा इंगळे, एआरटी केंद्र लोधिवली, एम.जी.एम. हॉस्पिटल, कामोठे-पनवेल येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी योगदान दिले.

Exit mobile version