खर्चात कपात करण्यासाठी कठोर निर्णयाची शक्यता
| दुबई | वृत्तसंस्था |
मेलबर्न: रद्द होण्याच्याउंबरठ्यावरून ऐनवेळी ग्लासगो शहराने दिलेल्या साथीमुळे 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी खर्चाचा भार कमी करण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांचा विचार सुरू असून यातून हॉकी खेळाला वगळले जाणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा घेण्यासाठी खर्चाची कपात करावी लागणार आहे आणि त्यासाठी स्पर्धा नेहमीच्या 19 क्रीडा प्रकारांऐवजी 10 प्रकारांत घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. वगळण्यात येणारे खेळ कोणते हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या संदर्भात तयार करण्यात आलेल्या अहवालात हॉकी खेळाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य खेळांची नावे अजून समोर आलेली नाहीत. हे वृत्त वार्यासारखे पसरल्यानंतरही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने प्रतिक्रिया देणे टाळले. ”या स्पर्धेचे स्वरूप आणि अधिकृत कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम समोर आल्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया देऊ”, असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा सर ख्रिास हॉय वेलोड्रोम, स्कॉटस्टॉन स्टेडियम, टोलक्रॉस आंतरराष्ट्रीय जलतरण संकुल आणि स्कॉटिश इव्हेंट्स कॅम्पस अशा केवळ चारच केंद्रांवर होणार आहे. या एकाही केंद्रावर हॉकी टर्फ उपलब्ध नाही. आयोजक नव्याने टर्फ निर्माण करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळेच हॉकीला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असे मानले जात आहे. भारत, ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक फटका राष्ट्रकुल स्पर्धेतून हॉकीला वगळण्याचा निर्णय झाल्यास याचा सर्वाधिक फटका भारत आणि ऑस्ट्रेलियाला बसणार आहे. भारतीय पुरुष संघाने या स्पर्धेत तीन रौप्य आणि दोन कांस्य, तर महिला संघाने 2000च्या स्पर्धेतील सुवर्ण आणि अन्यही दोन पदके पटकावली आहेत. ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने पुरुष विभागातून विक्रमी सात वेळा, तर महिला संघाने चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली आहे.