। मुरूड-जंजिरा । वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील तापमान मंगळवारी (दि.22) 33 सेल्सियसवर पोचले होते. या ऑक्टोबर हिटमुळे मुरुडकर बेहाल झाले होते. दुपारच्या वेळेत उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक तसेच पर्यटकांनी घराबाहेर न पडण्याला पसंती दिली होती. यामुळे तालुक्यातील रस्ते, बाजारपेठा तसेच समुद्रकिनारा ओस पडला होता. याचा मोठा परिणाम पर्यटनावर झाला आहे.
ऑक्टोबर हिटचा परिणाम केवळ मानवी जीवनावरच नाही तर मुक्या जनावरांवर व समुद्रातील जलचरांनादेखील झाला आहे. उथळ समुद्रात आलेली मासळी देखील थंडाव्यासाठी खोल समुद्रात गेल्याची माहिती एकदरा, राजपुरी आदी भागातील मच्छीमारांनी दिली आहे. तसेच, मंगळवारी मुरुडच्या बाजारपेठेत देखील फारशी मासळी दिसून आली नाही. गेल्या आठवड्यात काशीद, मुरूड समुद्रकिनार्यावर पर्यटक आले होते. मात्र, रविवारनंतर पर्यटकांची पांगापांग झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिट वाढल्याने पर्यटकांनी घरचा रस्ता पकडल्याने पर्यटन व्यवसाय मंदावला आहे. जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठीदेखील पर्यटक दिसले नाहीत. गर्मीमुळेदेखील पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे पर्यटक व्यवसायिकांनी सांगितले.